काँग्रेस नेहमीच विजयाच्या वातावरणातदेखील पराभवाच्या गर्तेत का जाते ?
नुकतेच ४ राज्यांतील विधानसभेचे निकाल जाहीर झाले. एक्सिट पोल मध्ये काँग्रेस साठी सर्वत्र पोषक वातावरण असताना आणि २ राज्यात विद्यमान सरकारे असताना देखील काँग्रेस पक्षाला ३ राज्यात पराभवास सामोरे जावे लागले, तर तेलंगणामध्ये अपेक्षित यश प्राप्त झाले. यामुळे सर्वांच्या मनात एक प्रश्न निर्माण होतो कि भारतातील सर्वात जुन्या पक्षाच्या पदरी नेहमी विजयासाठी पोषक वातावरण असतानादेखील पराभव का पडतो ?
याबाबतचे सखोल विश्लेषण केल्यानंतर आपल्या लक्षात येईल कि पक्षातील अंतर्गत गटबाजी आणि जुन्या पिढीच्या नेतृत्वाद्वारे नव्या नेतृत्वाला मागे खेचण्याची पद्धत ही दोन कारणे प्रामुख्याने दृष्टीक्षेपात येतात. याचे ज्वलंत उदाहरण आपण मध्यप्रदेशात पाहू शकतो. भाजप व आरएसएस यांचा बालेकिल्ला असलेल्या मध्यप्रदेशात २०१८ साली काँग्रेसने घवघवीत यश संपादन केले. या यशामागे पक्षाचे युवा नेतृत्व ज्योतिरादित्य सिंदिया यांचा व्यापक प्रचार तसेच त्याचे प्रभावी व्यक्तिमत्व मुख्यत: जबाबदार ठरले. परंतु जेव्हा मुख्यमंत्री निवडीचा प्रश्न आला तेव्हा सिंदिया यांना डावलून पक्षाने जुने नेतृत्व कमलनाथ यांची निवड केली. परिणामस्वरूप सिंदिया यांनी दीड वर्षातच पक्षातून बाहेर पडून काँग्रेसचे सरकार पाडले आणि २०२३ च्या निवडणुकीत देखील ग्वाल्हेर, चंबळ व छिंदवाडा या भागात आपला प्रभाव असल्याचे दाखवून दिले. काँग्रेस नेतृत्वाचे सिंदियांचे नेतृत्व गुण ओळखण्यात आलेले अपयश तसेच त्यांना जुन्या नेतृत्वाकडून मिळत असलेली हीन वागणूक यामुळेच पक्षातून एक प्रभावी युवा नेतृत्व बाहेर पडले .
अशाच प्रकारची वागणूक ही राजस्थान मध्ये सचिन पायलट या काँग्रेसच्या युवा नेतृत्वास देखील मिळाली. २०१८ सालच्या निवडणुकीत काँग्रेसने राजस्थानमध्ये सत्ता स्थापन केली आणि या विजयाचे शिल्पकार हे तत्कालीन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व गुज्जर नेते सचिन पायलट ठरले. त्यांनी पूर्व राजस्थानात अपेक्षेपेक्षा अधिक चांगली कामगिरी केली व गुज्जर या परंपरागत भाजप मतदारांना काँग्रेसकडे वळविले. मात्र, अशोक गेहलोत यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ पडली. परिणामी गुज्जर समाजाचा भ्रमनिरास झाला, त्याचा परिणाम सध्याच्या विधानसभा निवडणुकीवर दिसून आला. त्यामुळे पक्षातील अंतर्गत गटबाजी व जुन्या नेतृत्वाकडून सतत मिळणाऱ्या हीन वागणुकीच्या परिणामार्थी राजस्थानमधील उदयास येणारे प्रभावी युवा नेतृत्व पक्षापासून दूर जाण्याची आशंका जास्त वाटते आहे.
या दोन हिंदी भाषिक राज्यासारखीच स्थिती आपण आसाममध्ये पाहू शकतो जेथे हेमंत बिश्वा शर्मा यांच्या सारख्या प्रतिभावान काँग्रेस युवा नेत्याने माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई सारख्या जुन्या नेतृत्वास कंटाळून भाजपामध्ये प्रवेश केला आणि केवळ आसामच नाही तर संपूर्ण ईशान्य भारतात कसलेही राजकीय अस्तित्व नसलेल्या भाजपाचा भक्कम पाया निर्माण केला. अशाच प्रकारची स्थिती आपल्याला उत्तर प्रदेशातील काँग्रेसचे युवा नेते जितीन प्रसाद, हरियाणातील दिपेंद्र हुडा तसेच दिल्ली मध्ये संदीप दीक्षित या युवा नेत्यांच्या बाबतीत देखील पाहावयास मिळतात, ज्यांच्या नेतृत्व गुणांना देखील जुन्या फळीच्या नेत्यांमुळे वाव मिळाला नाही. याच धर्तीवर तेलंगाणा विधानसभा निवडणुकीतील यशानंतर विजयाचे शिल्पकार रेवंथ रेड्डी यांनादेखील अशा प्रकारची वागणूक मिळण्याबाबतच्या बातम्या येत आहेत.
अशाच प्रकारचे उदाहरण आपल्याला महाराष्ट्रासारख्या देशातील प्रमुख राज्यात देखील पाहावयास मिळते. महाराष्ट्र युवक काँग्रेस अध्यक्ष राहिलेले तसेच सध्या राज्याचे विधानपरिषद सदस्य असलेले सत्यजित तांबे हे देखील पक्षातील अंतर्गत गटबाजीचे शिकार झाल्याचे आपल्याला पाहावयास मिळते. काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ म्हणून ओळख असलेल्या घराण्याचे सत्यजित तांबे प्रतिनिधित्व करतात आणि एक अभ्यासू व तरुणांचे प्रेरणास्थान म्हणून त्यांची राज्यभर ख्याती आहे. त्यांनादेखील पदवीधर मतदारसंघातून विधानपरिषद सदस्य निवडणुकीमध्ये राज्य काँग्रेस कार्यकारिणी समितीच्या अरेरावी कारभाराचा फटका बसलेला आहे. विद्यार्थीदशेपासूनच काँग्रेस पक्षाचे सक्रिय सभासद, उच्च विद्याविभूषित, दोन वेळा जिल्हा परिषद सदस्य आणि महाराष्ट्र युवक काँग्रेस अध्यक्ष म्हणून यशस्वी कार्यकाळ असून देखील काही जुन्या वरिष्ठ नेत्यांच्या आडमुठेपणामुळे २०२२ साली पक्षाकडून एबी फॉर्म मिळाला नाही, परिणामी ते अपक्ष म्हणून निवडणुकीस सामोरे गेले व त्यांनी विजयश्री देखील संपादित केली. अशा अभ्यासू, प्रतिभावान, जमिनीवर कार्य करणारा व युवकांच्या गळ्यातील ताईत असलेल्या युवा नेतृत्वाच्या क्षमतांचा पक्षाला फायदाच झाला असता, परंतु काही दूरदृष्टीहीन वरिष्ठांमुळे काँग्रेस पक्ष अशा तरुण नेतृत्वास गमावून बसला आहे.
अशारीतीने युवा नेतृत्वास बाजूला सारल्याने तसेच त्यांच्या नेतृत्व गुणांचा योग्य वापर न करून घेतल्यामुळे काँग्रेस पक्षाला निवडणुकीत अपयशाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे पक्षाने आता तरी युवा नेतृत्वास पक्ष बांधणीत संधी देऊन त्यांच्या मार्फत करोडो तरुणांशी संपर्क जोडला पाहिजे आणि अशा या नव्या युगाच्या नव्या दमाच्या फिनिक्स पक्षांना उंच गगनभरारी घेण्यास पाठबळ द्यावे. कारण इतर राजकीय पक्ष हे काँग्रेस पक्षातर्फे दुर्लक्षित होत असलेल्या प्रतिभावान युवा नेतृत्वाचे भांडवल करत असल्याने काँग्रेसच्या अस्तित्वाचा प्रश्न भविष्यात निर्माण होऊ शकतो. त्यामुळे स्वतःला पुनरुज्जीवित करण्यासाठी आणि देशातील लोकशाही टिकविण्यासाठी काँग्रेस पक्षाने आपली युवा नेत्यांच्या अडचणी समजून घेतल्या पाहिजे व त्यावर तातडीने उपाययोजना करून त्यांना योग्य तो सन्मान , योग्य ते व्यासपीठ प्रदान केले पाहिजे.
शेवटी आपण असा निष्कर्ष काढू शकतो कि, काळानुसार नेतृत्वबदल स्वीकारण्याची तयारी दर्शवणारा व स्वत:स बदलण्याची क्षमता असलेला राजकीय पक्ष हा खऱ्या अर्थाने लोकशाहीचा पुरस्कर्ता म्हणून ओळखला जाऊ शकतो. त्यामुळे काँग्रेस पक्षाने देखील आपल्या जवळ असलेल्या युवा शक्तीला ओळखणे व त्यांना पाठबळ देणे गरजेचे आहे. तसे केले तरच काँग्रेस पक्ष आणि परिणामी देशातील लोकशाही टिकेल.
Written by – Pratik Verma ( Political Strategist) राजनीतिक रणनितिकार