एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडेंच्या अडचणी संपता संपेनात
मुंबई | क्रूझवरील ड्रग्ज पार्टीवर छापा टाकून अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानला अटक करणारे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे विभागीय संचालक समीर वानखेडेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. समीर वानखेडेंनी केलेल्या कारवायांबद्दल अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. वानखेडेंनी बोगस कागदपत्रांच्या आधारे नोकरी मिळवल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला. त्यामुळे वानखेडेंच्या अडचणी वाढल्या आहेत.
समीर वानखेडेंचं कुटुंब मुस्लिम होतं. वानखेडेंचा पहिला विवाह मुस्लिम तरुणीशी झाला. मात्र त्यानंतर नोकरीसाठी अर्ज करताना वानखेडेंनी दलित असल्याचं प्रमाणपत्र सादर केलं, असा आरोप मलिक यांनी केला आहे. आता यावर सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी एक महत्त्वाचं विधान केलं आहे. वानखेडेंच्या प्रमाणपत्राच्या वैधतेबद्दल कोणी आक्षेप नोंदवल्यास तर सामाजिक न्याय विभाग त्याची चौकशी करेल, असं मुंडे म्हणाले आहेत. पुण्यात पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी हे विधान केलं.
मुंडेंच्या विधानानंतर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी महाविकास आघाडीवर पलटवार केला. ‘राज्य सरकार वानखेडेंच्या विरोधात अजेंडा राबवत आहे. सरकारकडून वानखेडेंना लक्ष्य केलं जात आहे. वानखेडे ना आमच्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत, ना कोण्या भाजप नेत्याचे नातेवाईक. पण अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांविरोधात कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्याविरोधात राज्य सरकारकडून घेतली जाणारी भूमिका निषेधार्ह आहे’ असं दरेकर म्हणाले.