नाशिक : तरुण म्हणजे देशाचे भविष्य असून उद्याचा सक्षम भारत घडवण्याची क्षमता तरुणांमध्ये आहे. परंतु आज अनेक तरुणांकडे शिक्षण असूनही रोजगार उपलब्ध नाही. अनेक तरूणांमध्ये गुणवत्ता असूनही केवळ योग्य मार्गदर्शन न मिळाल्याने ते या स्पर्धेच्या युगात मागे पडत असल्याचे दिसून येत आहे. योग्य वेळी व योग्य वयात स्वतःचे भविष्य घडविण्यासाठीची आवश्यक माहिती त्यांना वेळेवर मिळत नसल्याने त्यांचे कमालीचे नुकसान होत आहे. असे चित्र अनेकदा समोर आले आहे.
महत्वाचे म्हणजे राज्य सरकारकडे तरुणांच्या विकासासाठी एक स्वतंत्र विभाग अजूनही अस्तित्वात नाही. राज्यातील युवक कल्याण विभाग हा क्रीडा विभागाशी संलग्न आहे. राज्यात तरुणांसाठी विविध योजना या विभागामार्फत राबवल्या जातात. मात्र या योजनांची माहिती प्रत्येक युवकापर्यंत पोहोचतेच असे नाही. या युवकांचे योग्य माहितीअभावी नुकसान होऊ नये, युवकांना योजनांची माहिती मिळविण्यासाठी एक विश्वासार्ह व्यासपीठ मिळावे, तसेच त्यांच्या कल्पकतेला व उद्यमशीलतेला चालना मिळावी, या हेतूने सत्यजीत तांबे यांनी ‘Younnovation Center’ ची अभिनव संकल्पना पुढे आणली आहे.
‘Younnovation Center’ मध्ये मिळणार सर्व माहिती
Younnovation संकल्पनेंतर्गत उत्तर महाराष्ट्रातील तरुणांसाठी राज्य, देश, परदेशातील शिक्षण, व्यवसाय, करिअर, नोकरी याबाबतचे सविस्तर मार्गदर्शन उपलब्ध होणार आहे. तसेच विविध प्रकारच्या शिष्यवृत्ती, विविध विद्यापीठांच्या व अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रिया, करिअर संधी याविषयी देखील माहिती देण्यात येईल. तसेच, ज्या तरुणांना सरकारी नोकरभरतीच्या परीक्षा तसेच इतर स्पर्धा परीक्षांची तयारी करायची आहे, त्यांना देखील Younnovation Center च्या माध्यमातून मदत मिळणार आहे.
तसेच केवळ सरकारी नोकरी नाही, तर खासगी क्षेत्रांतील नोकरीच्या संधींविषयी देखील सविस्तर माहिती या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच स्वतःचा उद्योग-व्यवसाय करू इच्छिणाऱ्या तरुण तरुणींना देखील केंद्र व राज्य सरकारच्या यासंदर्भातील योजनांची माहिती आणि व्यवसाय सुरू करण्यासाठीचे मार्गदर्शन मिळणार आहे.