इको-फ्रेंडली गणेशमूर्ती कार्यशाळा
पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी मा.नगरसेवक सनी विनायक निम्हण यांचा कौतुकास्पद उपक्रम
(पुणे, १९ ऑगस्ट) – औंध-बोपोडी परिसरातील नागरिकांसाठी यंदाचा गणेशोत्सव अधिक अर्थपूर्ण आणि पर्यावरणपूरक ठरणार आहे. मा. नगरसेवक सनी विनायक निम्हण यांच्या पुढाकारातून “इको-फ्रेंडली गणेशमूर्ती कार्यशाळा” आयोजित करण्यात आली आहे. या उपक्रमात सहभागी होणाऱ्यांना शाडू मातीच्या गणेशमूर्ती तयार करण्याची थेट संधी मिळणार असून अनुभवी व प्रशिक्षित मूर्तीकारांकडून प्रत्यक्ष मार्गदर्शन दिले जाणार आहे.
कार्यशाळा येत्या रविवार, २४ ऑगस्ट रोजी पार पडणार असून दोन सत्रांमध्ये हा उपक्रम राबविण्यात येईल. औंध येथे (कै. इंदिरा गांधी प्राथमिक विद्यालय, सायं. ४.०० वा.) तसेच बोपोडी येथे (राजेंद्र प्रसाद प्राथमिक विद्यालय, सायं. ६.०० वा.) कार्यशाळा होणार आहे. विशेष म्हणजे शाडू माती आयोजकांकडून उपलब्ध करून दिली जाणार आहे. ७ ते १२ वर्षे व १२ वर्षांवरील वयोगटातील सहभागींसाठी ही कार्यशाळा खुली आहे.
“गणेशोत्सव हा केवळ सांस्कृतिक उत्सव नसून पर्यावरणपूरकतेचा संदेश देणारा सण असावा, हा यामागचा उद्देश आहे. मातीची मूर्ती तयार करताना मुलांना केवळ सर्जनशीलता अनुभवता येणार नाही तर निसर्गाशी एकात्मता देखील शिकता येईल,” असे आयोजकांनी सांगितले.
अधिक माहितीसाठी ८३०८१२३५५५ या क्रमांकावर संपर्क साधता येईल तसेच ऑनलाईन नोंदणीसाठी https://shorturl.at/0tZ0J
ही लिंक उपलब्ध आहे.