अदानी समुहाचा बाजार उठला, आठवड्याभरात तब्बल शंभर अब्ज डॉलर्सचे नुकसान

अमेरिकेतील शॉर्ट सेलिंग फर्म हिंडेनबर्ग रिसर्च ने गेल्या आठवड्यात दिलेल्या अहवालानंतर, आठवड्याभरात अदानी समूहाच्या सर्व सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप तब्बल १०० अब्ज डाॅलरने खाली आले आहे. अदानी समूहाने अदानी एंटरप्रायझेस या प्रमुख कंपनीचा २०,००० कोटी रुपयांचा एफपीओ रद्द करण्याची घोषणा केल्यानंतर समूहाच्या सूचीबद्ध कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. त्यामुळे कंपन्यांच्या बाजार भांडवलात घट झाली.

गुरुवारी गौतम अदानी यांची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायझेसचा शेअर ५७० रुपयांनी घसरून १५६५ रुपयांवर आला. आरबीआयने अदानी समूहाला दिलेल्या कर्जाची बँकांकडून माहिती मागवली आहे. अदानी समूहाच्या कंपन्यांच्या शेअर्सची आठवडाभरात जोरदार विक्री झाल्यानंतर शेअर बाजार नियामक सेबी समोर आली आहे. सेबी अदानी समूहाच्या शेअर्समध्ये झालेल्या जबरदस्त घसरणीची चौकशी करत आहे. समूहाच्या इतर कंपन्यांचे शेअर्सची १० टक्क्याने घसरले आहेत.

गुरुवारी सुरुवातीच्या व्यवहारात अदानी समूहाच्या १० पैकी ६ सूचीबद्ध कंपन्यांच्या शेअर्समध्ये लोअर सर्किट लागले. शेअर्सच्या प्रचंड घसरणीमुळे समूहाच्या मार्केट कॅपमध्ये मोेठी घट झाली. अदानी समूहाच्या कंपन्यांचे एकूण मार्केट कॅप २४ जानेवारी रोजी १९ लाख १६ हजार ५६० कोटी रुपये होते. आते ते १० लाख ५१ हजार ८०२ कोटी रुपयांवर आले आहे. म्हणजे अवघ्या एका आठवड्यात आदानी समूहाला ७ लाख ९ हजार ७७८ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

अदानी एंटरप्रायझेसचा एफपीओ रद्द करणे हा अदानींसाठी मोठा धक्का आहे. अमेरिकन शॉर्ट सेलिंग फर्मच्या अहवालात उघड झालेल्या गोष्टींमुळे अदानी समूहाच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाल्यामुळे अदानी एंटरप्रायझेसचा एफपीओ रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागला. अदानी एंटरप्रायझेसच्या एफपीओला १०० टक्क्यांहून अधिक सबस्क्रिप्शन मिळत असूनही गौतम अदानी यांना फॉलो-ऑन पब्लिक ऑफर मागे घ्यावी लागली. कंपनीच्या शेअर्समध्ये झालेल्या प्रचंड घसरणीमुळे गौतम अदानी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत खूप खाली घसरले आहेत. यासह ते आता आशिया आणि भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती नाहीत.

समूहाची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायझेसचा शेअर गुरुवारी १० टक्क्यांनी घसरला. त्याचप्रमाणे अदानी पोर्ट्स, अदानी टोटल गॅस, अदानी ग्रीन एनर्जी आणि अदानी ट्रान्समिशनचे शेअर्सही १०-१० टक्क्यांनी घसरले. त्याच वेळी अदानी पॉवर आणि अदानी विल्मार प्रत्येकी ५-५ टक्क्यांनी घसरले.

Leave A Reply

Your email address will not be published.