अजितदादा याचा हिशोब व्याजासकट चुकता करतील – रुपाली चाकणकर
पुणे | देशातील आणि राज्यातील राजकारणाची पातळी ज्या पद्धतीने खाली घसरली आहे ते धक्कादायक आहे. सरकारी यंत्रणांचा अयोग्य वापर करत एखाद्याचं राजकीय आयुष्य उध्वस्त करण्याचा प्रयत्न भाजपला काही नवीन नाही ते त्यांच्या रक्तातच आहे पण एखाद्या व्यक्तीवरील राग म्हणून त्याच्या कुटुंबाला , बहिणींना त्रास देण्याची ही कुठली पद्धत? असा शब्दात राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी भापजवर जोरदार निशाणा साधला आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या निकटवर्तीयांच्या घरावर, कार्यालयावर आयकर विभागाची छापेमारी आजही सुरू आहे. यावरून राष्ट्रवादीकडून भाजपवर जोरदार टीका केली जात आहे. याबाबत बोलताना राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी म्हटले आहे की, ‘एखादी व्यक्ती आपल्या यंत्रणेला जुमानत नाही , आपल्या पक्षाला जुमानत नाही तेंव्हा त्याच्या कुटुंबातील महिलांना टार्गेट करून त्या व्यक्तीला हार मानायला लावणार असाल तर लक्षात ठेवा की ते अजित दादा आहेत. माणूस स्वतःवर आलेल्या कोणत्याही संकटांशी सामना करेल परंतु यामध्ये विनाकारण घरातील महिलेला ओढून यातून राजकारण करत असेल तर तो व्याजासकट याचा हिशोब चुकता करत असतो.’ असा घणाघात चाकणकर यांनी केला आहे.