अंगणवाडी सेविकांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी आ. सत्यजीत तांबे प्रयत्न करणार !
अंगणवाडी सेविका व कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी संपूर्ण राज्यभरात आंदोलन सुरु आहे. याच पार्श्ववभूमीवर संगमनेर येथील अंगणवाडी सेविकांच्या काही संघटनांनी आमदार सत्यजीत तांबे यांची भेट घेतली. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार अंगणवाडी सेविकांचं योगदान महत्वाचे ठरणार आहे. परंतु बालशिक्षणात मोलाची भूमिका बजावणाऱ्या या अंगणवाडी सेविकांना विविध मागण्यांसाठी 4 डिसेंबरपासून संप पुकारला आहे. अंगणवाडी सेविकांच्या मागण्यांवर सरकारने गांभीर्याने विचार केला पाहिजे, अशी आ. सत्यजीत तांबे यांनी भूमिका मांडली आहे.
अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा, सन्मानजक वेतनवाढ, दरमहा पेन्शन याविविध मागण्यांसाठी अनेक महिन्यांपासून राज्यभर आंदोलने सुरू असून दोन वर्षे झाली तरी सरकारने या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची अंमलबजावणी केलेली नाही. या अंगणवाडी सेविकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आ. सत्यजीत तांबे हिवाळी अधिवेशनातही हा मुद्दा उपस्थित करणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
राज्यातील तीन हजार अंगणवाडी मदतनीस यांना अंगणवाडी सेविका पदावर पदोन्नती देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. तरी देखील त्याची ठोस अंमलबजावणी अजूनही झालेली नाही. या अंगणवाडी सेविकांच्या पाठिशी भविष्यकाळात खंबीरपणे उभे राहून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहे, असे आ. सत्यजीत तांबे यांनी सांगितले.