मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते येवला शहरासाठी महायुतीच्या ऐतिहासिक वचननाम्याचे अनावरण

येसगाव पाणीपुरवठा योजना प्राधान्याने पूर्ण करण्यासह येवला शहराच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक महत्वाकांक्षी योजना पूर्ण करण्यावर राहणार भर -छगन भुजबळ

येवला, दि. २५ नोव्हेंबर: राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी आज येवला शहरासाठी महायुतीचा वचननामा जनतेसमोर सादर केला. हृदयशस्त्रक्रियेनंतर सध्या मुंबईत उपचार घेत असलेल्या मंत्री भुजबळ यांनी त्यांच्या निवासस्थानावरूनच या वचननाम्याचे अनावरण केले. येवला मतदारसंघाविषयीची तळमळ आणि जबाबदारी यामुळेच त्यांनी आरोग्याच्या अवस्थेतही हा वचननामा सादर केल्याचे सांगितले.
महायुतीच्या या वचननाम्यात येवला शहराच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक महत्वाकांक्षी योजनांचा समावेश करण्यात आला आहे. पाणीपुरवठा, रस्तेवाहतूक, उद्योगविकास, पर्यावरण, आरोग्यसेवा, क्रीडा, संस्कृती संवर्धन अशा विविध क्षेत्रांतील प्रकल्पांना या वचननाम्यात स्थान देण्यात आले आहे.

पाणीपुरवठा योजनेसाठी कोट्यवधी रुपयांची तरतूद
महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानांतर्गत येसगाव पाणी पुरवठा योजना साकारली जात आहे. १६३ कोटी ४२ लक्ष रुपयांच्या या योजनेमुळे येवला शहराला पुढील ३३ वर्षांसाठी दररोज पुरेसे आणि शुद्ध पाणी उपलब्ध होणार आहे. शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता दुसऱ्या टप्प्यात ८६ कोटी ५१ लक्ष रुपयांची योजना सुरू करण्यात येणार आहे.

स्वच्छता आणि सांडपाणी व्यवस्थापनासाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक
शहराला स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी उघड्या गटारी बंदिस्त करणारी ८२ कोटी रुपयांची शहरी भुयारी गटार योजना टप्पा १ सध्या सुरू आहे. मलनिस्सारण केंद्राची क्षमता १३ दशलक्ष लिटर एवढी करण्यात येणार आहे. घराघरातून कचरा गोळा करून बायोमायनिंग प्रकल्पात आणला जाईल. ४२ हजार ११ मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची या प्रकल्पाची क्षमता असेल.

वाहतूक कोंडीतून मुक्ती आणि रस्ते विकास
शहरातील वाहतूक कोंडीतून मुक्ती मिळवण्यासाठी बायपास रस्त्याचे काम प्राधान्याने पूर्ण करण्यात येणार आहे. येवला शहर बाह्यवळण रस्त्यासह मनमाड-येवला-कोपरगाव चौपदरी काँक्रीट रस्त्याचे काम सुरू राहील. शहर रस्ते विकास प्रकल्पाअंतर्गत येवला शहरातील ७९ दशमांश ७० किलोमीटर रस्त्यांचा रस्ते विकास आराखडा तयार करण्यात येणार आहे. शहरातील सर्व रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.

उद्योग आणि व्यवसाय विकासासाठी नवीन योजना
चिंचोडी औद्योगिक वसाहतीत ५० एकर जागेवर कांदा प्रक्रिया उद्योग सुरू होत आहे. पीएम मित्रा सिल्क पार्क हा केंद्र सरकारचा प्रकल्प कार्यान्वित होणार आहे. वाणिज्य संकुलात विस्थापीत व्यावसायिकांना लातूर पॅटर्नद्वारे दिलासा दिला जाईल. आणखी वाणिज्य संकुल उभारून व्यवसायाला चालना देण्याचे आश्वासन महायुतीने दिले आहे.

पैठणी उद्योगाच्या विकासासाठी विशेष उपक्रम
येवला पैठणीचे ब्रँडिंग करतानाच या उद्योगाला भरभराटीला आणण्यासाठी नाशिक, पुणे, मुंबई येथे पैठणी फेस्टिव्हलचे आयोजन केले जाईल. बारा कोटी २९ लक्ष रुपयांच्या निधीतून अत्याधुनिक पैठणी क्लस्टरचे काम प्रगतीपथावर आहे. क्लस्टरमध्ये धाग्यावर प्रक्रियेसाठी डाईंग, वारपिंग, डिझाईन आणि गारमेंट सेंटर आदी सुविधा असणार आहेत. तीन हजार कारागीरांना याचा लाभ मिळणार आहे. हातमाग विणकरांना प्रोत्साहन आणि सुविधा देण्यासाठी आठ कोटींच्या निधीतून अर्बन हट केंद्र किंवा एक्झिबिशन सेंटर स्थापण्यात येणार आहे.

आधुनिक नगरपालिकेचा संकल्प
पारदर्शक व लोकाभिमुख कारभारासाठी नगरपालिका कार्यालय कामकाजाचे संपूर्ण संगणकीकरण करण्यात येईल. विविध ना हरकत दाखले, नोंदी, जन्म-मृत्यू नोंदी आदी सुविधा ऑनलाईन उपलब्ध करून दिले जातील. मालमत्ता कर, पाणी पट्टी व अन्य कर घरबसल्या नागरिकांना ऑनलाईन भरणे, अर्जाची माहिती घरीच ऑनलाईन पाहणे, मोबाईलवरूनच नगरपालिकेकडे तक्रार करणे, तक्रारींचा निपटाराही त्वरीत व्हावा यासाठी स्वतंत्र प्रणाली सुरु करण्यात येणार आहे.

नमो उद्यानासह विविध सुविधांचे आश्वासन
शहरातील नागरिकांना एक उत्कृष्ट दर्जाचे मनोरंजन केंद्र निर्माण व्हावे म्हणून नमो उद्यान साकारले जाईल. त्यात लहान मुलांसाठी खेळणी, वयोवृद्धांसाठी चालण्याचे मार्ग, आकर्षक बागा व पाण्याचे फवारे बसविण्यात येतील. एक कोटी रुपयांच्या निधीची त्यासाठी तरतूद करण्यात येणार आहे. माजी नगराध्यक्ष कै. केशवराव पटेल मार्केटचा विकास करून याठिकाणी अद्ययावत भाजीपाला मॉल उभारण्यात येणार आहे.

आरोग्य आणि क्रीडा सुविधांवर भर
उपजिल्हा रुग्णालयात २० खाटांचे ट्रामा केअर सेंटर निर्माण करण्यात येणार आहे. येवला येथे महिला व बालरुग्णालय सुरू करण्यात येणार आहे. तालुका क्रिडा संकुलाचे नूतनीकरण पूर्ण करून अत्याधुनिक सोयी-सुविधा तसेच दर्जेदार क्रिडा प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यात येणार आहे. येवला शहरात दर्जेदार कुस्ती प्रशिक्षण अकादमी साकारण्यात येणार आहे. शहर विकास आराखड्यात राखीव जागांवर सर्व सुविधायुक्त क्रीडांगण विकसित करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.

मंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले की येवलेकर विकासालाच मत देतील असा त्यांना विश्वास आहे. वचननाम्यातील गोष्टींची पूर्तता करण्यावर आमचा भर असेल असेही त्यांनी सांगितले. महायुतीने सादर केलेल्या या वचननाम्याने येवला मतदारसंघातील राजकीय वातावरणात गंभीरतेची भर पडली आहे असे निरीक्षण करण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.