२७ फेब्रुवारी / नाशिक- पुण्यातील स्वारगेट एसटी बस स्टँडवर शिवशाही बसमध्ये एका २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार करण्यात आल्याची घटना सकाळी उजेडात आली. ही घटना २५ फेब्रुवारी रोजी पहाटे साडेपाचच्या सुमारास घडली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, आरोपीच्या शोधासाठी १३ पथके तैनात केली आहेत. या घटनेवर महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस नेते छगन भुजबळ यांनी अत्यंत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
छगन भुजबळ याबद्दल बोलताना म्हणाले की, “मी वर्तमानपत्रातून पुणे बलात्काराची घटना वाचली. ही घटना अत्यंत धक्कादायक आहे. महाराष्ट्राच्या पोलिसांवर माझा पूर्ण विश्वास आहे. ते आरोपीला शोधून काढतील आणि अटक करतील. सरकारही या सगळ्या घटनेमध्ये काळजीपूर्वक आदेश देत आहे. मात्र, पुणे बलात्काराची घटना लांछनास्पद आहे. हे कसं झालं? काय झालं? याची चौकशी सुरू आहे. इतर अनेक गोष्टी त्या ठिकाणी सापडल्या आहेत. या आधीही असं काही घडलं आहे का? जर होत असेल, तर लोक गप्प कसे बसले? पोलीस गप्प बसले? याची चौकशी झाली पाहिजे, ही सगळ्यांचीच मागणी आहे.”
काय आहे घटना?
पुण्यातून फलटणला जाण्यासाठी आलेल्या तरुणीवर स्वारगेट एसटी बस स्टँडवर बलात्कार करण्यात आला. घटना पहाटे साडेपाचच्या सुमारास घडली असून, पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीची ओळख पटवली आहे. आरोपी हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर याआधी अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी १३ पथके तयार केली आहेत.
पोलिसांकडून तपास सुरू
पुणे पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून, आरोपीच्या शोधासाठी १३ पथके तैनात केली आहेत. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीची ओळख पटवली असून, त्याला शोधण्यासाठी १ लाख रुपयांचे बक्षीसही जाहीर केले आहे. या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत.
या घटनेमुळे जनतेत मोठा रोष निर्माण झाला असून भीतीचे वातावरण आहे. समाजाच्या सर्व स्तरातून या घटनेविषयी निषेधात्मक प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात असून, आरोपीला त्वरित अटक करून कठोर शिक्षा देण्याची मागणी करण्यात येत आहे.