पाषाण परिसरातील सुरक्षिततेच्या प्रश्नावर मा.नगरसेवक सनी विनायक निम्हण यांची ठोस पावले उचलण्याची मागणी
रात्रीच्या गस्तीसह सीसीटीव्ही आणि पोलिस बंदोबस्ताकरिता पोलीस आयुक्तांकडे पत्राद्वारे सुचवले उपाय
पुणे, 23 एप्रिल : पुण्यातील शांत, सुसंस्कृत आणि प्रगत म्हणून ओळख असलेल्या पाषाण – सोमेश्वरवाडी परिसरात सध्या रात्रीच्या वेळी काही युवकांकडून नशा करून सार्वजनिक ठिकाणी गैरवर्तन, दहशतीचे प्रकार केले जात असल्याने असुरक्षिततेचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. या पार्श्वभूमीवर माजी नगरसेवक सनी विनायक निम्हण यांनी पुणे शहर पोलीस आयुक्तांकडे निवेदनाद्वारे ठोस मागणी केली आहे की, परिसरात कडक उपाययोजना राबवण्यात याव्यात.
निवेदनात सनी निम्हण यांनी पुढील काही महत्त्वाच्या बाबींवर भर दिला आहे :
– रात्रीच्या वेळी पोलिसांची गस्त वाढवावी
– परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची संख्या आणि कार्यक्षमता वाढवावी
– संवेदनशील ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करावा
– नागरिक आणि पोलिस यांच्यात समन्वय वाढवण्यासाठी जनजागृती मोहिम राबवावी
“पाषाण परिसर कधीच अशा घटनांसाठी ओळखला जात नव्हता. नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाने त्वरित आणि ठोस पावले उचलावीत,” अशी स्पष्ट मागणी निम्हण यांनी पत्राद्वारे केली आहे.
समाजाच्या सुरक्षेच्या दृष्टीने सजग राहून तातडीने भूमिका घेणारे सनी निम्हण यांचे हे पाऊल परिसरातील नागरिकांसाठी निश्चितच आश्वासक आणि दिलासादायक ठरत आहे.