नवीन वाहतूक नियमांमुळे सामान्य जनतेचे कंबरडे मोडणार!
वाहतूक नियमांच्या अंमलबजावणीसाठी वाहतूक पोलिसांनी उगारले जनतेवर आर्थिक ब्रह्मास्त्र!
भारतात वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल वाहन दंड आकारण्यात आला आहे. सरकारने 1 मार्च 2025 पासून हे नवीन वाहतूक नियम लागू केले आहेत. जर तुम्ही नवीन नियम पाळले नाहीत तर तुमच्या खिशाला मोठा फटका बसणार आहे यांसह तुरुंगवास आणि सामुदायिक सेवा यासारख्या कठोर शिक्षा देखील होतील.
भारत सरकार सुरुवातीपासूनच रस्ते सुरक्षेबाबत अनेक पावले उचलत आहे. आता सरकारने मोटार वाहन नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल नवीन दंड आणि शिक्षेची अंमलबजावणी केली आहे. हे नवीन दंड 1 मार्च 2025 पासून लागू झाले आहेत. या नवीन नियमांनुसार, वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल दंड 10 पट वाढवण्यात आला आहे. कोणता वाहतूक नियम मोडल्यास तुम्हाला किती दंड आणि शिक्षा होऊ शकते हे आजच्या बामतीमधून जाणून घेऊ.
परवाना आणि विमा PUC शिवाय गाडी चालवणे:
जर तुमच्याकडे परवाना नसेल तर तुम्हाला 5000 रुपये दंड भरावा लागेल आणि जर तुमच्याकडे विमा नसेल तर 2000 रुपये दंड भरावा लागेल. यासोबतच, तुम्हाला तीन महिने तुरुंगवास आणि सामुदायिक सेवेची शिक्षा देखील होऊ शकते. प्रदूषण प्रमाणपत्र (पीयूसी) नसल्यास 10000 रुपये दंड आणि 6 महिने तुरुंगवासासह सामुदायिक सेवा देखील होऊ शकते. जर तुम्ही पुन्हा विम्याशिवाय पकडले गेलात तर तुम्हाला 4000 रुपये दंड भरावा लागेल.
मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवणे :
जर तुम्ही दारू पिऊन गाडी ड्राईव्ह करत असाल तर 10,000 रुपये दंड आणि 6 महिन्यांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो. पूर्वी हा दंड फक्त 1,000 ते 1500 रुपयांच्या दरम्यान होता. जर तुम्ही पुन्हा असे करताना पकडले गेलात तर तुम्हाला 15000 रुपये दंड आणि 2 वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो.
हेल्मेट न घातल्याबद्दल शिक्षा:
जर तुम्ही दुचाकी चालवताना हेल्मेट घातले नसेल तर तुम्हाला 1000 रुपये दंड भरावा लागेल. यासोबतच तुमचा परवाना तीन महिन्यांसाठी रद्द केला जाऊ शकतो. आधी हा दंड 100 रुपये होता. त्याचप्रमाणे, गाडी चालवताना सीट बेल्ट न लावल्यास 1,000 रुपये दंड आकारला जाईल.
ड्रायव्हिंग करताना फोनचा वापर:
जर तुम्ही गाडी चालवताना फोन वापरताना दिसलात तर तुम्हाला 5000 रुपये दंड होऊ शकतो. आधी हा दंड 500 रुपये होता.
ट्रिपल रायडिंग, डेंजरस ड्रायव्हिंग आणि रेसिंग:
जर तुम्ही गाडीवर ट्रीप सीट जातांना पकडले तर, तुम्हाला 1000 रुपये दंड भरावा लागेल. दुसरीकडे, जर तुम्ही डेंजरस ड्रायव्हिंग किंवा रेसिंग करताना पकडले गेले तर तुम्हाला 5000 रुपये दंड भरावा लागेल. दुसरीकडे, रुग्णवाहिकांसारख्या आपत्कालीन वाहनांना रस्ता न दिल्याबद्दल 10,000 रुपयांचा मोठा दंड भरावा लागेल.
सिग्नल तुटणे आणि ओव्हरलोडिंग:
नवीन नियमानुसार, सिग्नल तोडल्यास 5000 रुपये दंड आणि वाहन ओव्हरलोड केल्यास 20,000 रुपये दंड भरावा लागेल.
अल्पवयीन मुलांसाठी नियम अधिक कडक:
अल्पवयीन मुलांसाठी वाहतूक नियम अधिक कडक करण्यात आले आहेत. जर एखाद्या अल्पवयीन मुलाने वाहतूक नियमांचे उल्लंघन केले तर 25,000 रुपये दंड, 3 वर्षांचा तुरुंगवास, वाहन नोंदणी रद्द करणे आणि 25 वर्षांचे होईपर्यंत परवाना न देणे अशी शिक्षा होऊ शकते.
वाचकांच्या प्रतिक्रिया
वाहतुकीचे नियम मोडल्यास अवाजवी दंड आकारण्यामुळे अंमलबजावणी होईल का हा प्रश्न आहे? वाहतूक पोलिसांकडून होणाऱ्या दंड वसुलीची नेहमी चर्चा होत असते, वाढवलेल्या दंड आकारणीमुळे वसुलीला अधिक संधी निर्माण होतील का अशी भीती नागरिकांमधून व्यक्त यानिमित्ताने केली जात आहे.