जयहिंद लोकचळवळीच्या जागतिक परिषदेत महाराष्ट्रभरातून युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!
सुदृढ समाज, निकोप लोकशाही आणि मजबूत संविधान हे ध्येय घेऊन मा. डॉ. सुधीर तांबे यांच्या संकल्पनेतून संगमेनर येथे १९९८ साली जयहिंद लोकचळवळची स्थापना झाली. जयहिंद लोकचळवळी तर्फे दरवर्षी जागितिक परिषदेचे आयोजन केले जात असते. यंदाची जयहिंद लोकचळवळ आयोजित तीन दिवसीय जागतिक परिषद मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटरला पार पडली. या जागतिक परिषदेत देश – विदेशातील २० तज्ज्ञ वक्त्यांनी महाराष्ट्रातील ३०० तरुणांना शिक्षण, आरोग्य, कृषी, तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा, उद्योजकता विकास, स्री पुरुष समानता, कृत्रिम बुद्धिमत्ता अशा विविध विषयांवर मार्गदर्शन केले. तसेच जयहिंद लोकचळवळीचे कार्य राज्यभरात नेण्यासाठी योग्य संघटन कौशल्यांबाबतही तरुणांना प्रशिक्षण देण्यात आले.
आंतरराष्ट्रीय आरोग्यतज्ज्ञ डॉ. रवि गोडसे, पंजाब व दिल्ली येथील सार्वजनिक शिक्षणव्यवस्था सुधारण्यात मोलाचा वाटा असलेले शिक्षणतज्ज्ञ शैलेंद्र शर्मा, सामाजिक कार्यकर्त्या श्रीगौरी सावंत, अर्नाझ हाथीराम, कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान तज्ज्ञ नील गायकवाड, पायाभूत सुविधातज्ज्ञ सुनील रोहकले, सुरज गवांदे, अफगाणिस्तानच्या मैदान शहराच्या माजी महापौर झरिफा गफारी, आदी मान्यवरांनी या जागतिक परिषदेत सहभागी झाले. यासह जयहिंद लोकचळवळीचे संस्थापक अध्यक्ष आणि माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, संगमनेरच्या माजी नगराध्यक्षा दुर्गा तांबे यांनीही कृषी, महिला सक्षमीकरण, आरोग्य, शिक्षण अशा विविध प्रश्नांबाबत मार्गदर्शन केले.