जनभावनेखातर व येवल्याच्या प्रेमापोटी मंत्री छगन भुजबळ साधणार येवलेकरांशी ऑनलाईन संवाद

माजी खासदार समीर भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत आज होणार महायुतीची येवला नगरपरिषद निवडणूक प्रचार सभा

येवला, ३० नोव्हेंबर : येवला शहराच्या राजकीय आणि सामाजिक जीवनात गेली अडीच दशके अढळ स्थान निर्माण करून राहिलेले राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री माननीय छगनराव भुजबळ साहेब आज संध्याकाळी सहा वाजता येवला येथील ऐतिहासिक शनिपटांगणावरून ऑनलाईन माध्यमातून येवलेकर जनतेला संबोधित करणार आहेत. सध्या मुंबई येथे शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने विश्रांती घेत असले तरीही त्यांचे संपूर्ण लक्ष येवल्याच्या विकासाच्या प्रश्नांवरच केंद्रित आहे.

गेल्या पंचवीस वर्षांत येवला शहराचा चेहरामोहरा पालटून टाकणाऱ्या या जनप्रिय नेत्यांवर येवलेकरांनी मतपेटीतून अपरंपार विश्वास व्यक्त केला आहे. साहेबांच्या याच विश्वासार्ह नेतृत्वामुळे येवला शहराने विकासाच्या अनेक क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली आहे. सध्या साहेबांच्या अनुपस्थितीत देखील त्यांच्या मार्गदर्शनाखाली माजी खासदार समीरभाऊ भुजबळ, आमदार पंकजभाऊ भुजबळ तसेच प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे यांच्या नेतृत्वात निवडणूक प्रचाराची सर्व जबाबदारी कार्यरत पद्धतीने पार पाडली जात आहे.

येवलेकरांच्या मनात सातत्याने साहेबांच्या आरोग्याबाबत चिंता व्यक्त होत असून, साहेब कधी येणार, साहेबांचा आवाज ऐकायचा आहे, साहेबांची तब्येत ठीक आहे का, साहेबांनी सांगेल तोच उमेदवार आम्ही निवडून देऊ अशा भावना जनमानसात दिसून येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आजचा ऑनलाईन संवाद ठेवण्यात आला असून यामुळे येवलेकरांना थेट साहेबांचा आवाज ऐकण्याची संधी मिळणार आहे.

शहरातील काही उर्वरित विकासकामांच्या प्रश्नांसाठी देखील भुजबळ साहेबांच्या नेतृत्वात महायुतीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार उपमहाराष्ट्र केसरी राजेंद्र लोणारी आणि महायुतीचे नगरसेवक या प्रश्नांचे निराकरण करतील अशी येवलेकरांमध्ये दृढ श्रद्धा आहे. साहेबांच्या मार्गदर्शनाखालीच येवला शहराच्या भवितव्याचा मार्ग निश्चित होणार असल्याचे स्थानिक नागरिक मानतात.

या ऐतिहासिक संवादासाठी येवला शहरातील सर्व नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहून साहेबांचे मार्गदर्शन ऐकण्याची विनंती करण्यात आली आहे. छगनराव भुजबळ साहेब यांचा हा ऑनलाईन संवाद येवला शहराच्या राजकीय परिदृश्यात एक महत्त्वाचा टप्पा ठरावा अशी सर्वांची अपेक्षा आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.