ओबीसी मुद्द्यावरून नाराज छगन भुजबळांचे मुख्यमंत्र्यांकडून जाहीर कौतुक
मंत्री छगन भुजबळ व माजी खासदार समीर भुजबळ यांच्या प्रयत्नांतून नाशिकमध्ये साकारलेल्या सीपीआरआय टेस्टिंग लॅबचे केंद्रीय ऊर्जा मंत्री मनोहरलाल खट्टर व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भव्य उद्घाटन
नाशिक, ११ सप्टेंबर : “सीपीआरआय टेस्टिंग लॅबसाठी ही जमिन उपलब्ध होण्यासाठी भुजबळांनी पाठपुरावा केला आणि नाशिकमध्ये प्रकल्पासाठी जमीन उपलब्ध होण्यासाठी त्यांचे प्रयत्न महत्त्वाचे आहेत. त्यानंतर निश्चितपणे एक चांगली व्यवस्था आपल्या राज्यामध्ये तयार झाली” अशा शब्दांमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री छगन भुजबळ यांचे कौतुक केले. नाशिक जिल्ह्यातील शिलापूर येथे उभारण्यात आलेल्या केंद्रीय विद्युत संशोधन संस्था (सीपीआरआय) च्या प्रादेशिक चाचणी प्रयोगशाळेचे उद्घाटन मंगळवारी पार पडले. याप्रसंगी ते बोलत होते. शिलापूर येथील या प्रयोगशाळेचे उद्घाटन केंद्रीय ऊर्जा मंत्री मनोहरलाल खट्टर, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, तसेच पाणीपुरवठा मंत्री गिरीश महाजन आणि शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते संपन्न झाले.
फडणवीस व नाराज भुजबळांचा एकाच विमानातून प्रवास
या उद्घाटन समारंभात एक महत्त्वाची गोष्ट घडली. आरक्षणाच्या मुद्द्यावरून सध्या राज्य सरकारवर नाराज असलेले मंत्री छगन भुजबळ आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कार्यक्रमासाठी एकाच विमानाने प्रवास केला. तसेच विमानतळापासून शिलापूरच्या उद्घाटन स्थळापर्यंत देखील या दोघांनी एकाच गाडीतून प्रवास केला. या पार्श्वभूमिवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलेले भुजबळ यांचे जाहीर कौतुक सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. तसेच ही जवळीक सरकार आणि मंत्री भुजबळ यांच्यातील मतभेदांवर मात करून जनहिताच्या प्रकल्पासाठी सामूहिक प्रयत्न करण्याची तयारी दर्शवते.
छगन भुजबळ यांचा पाठपुरावा
या प्रकल्पाच्या उभारणीत राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचे असलेले प्रयत्न, योगदान याचा उल्लेख मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. माजी खासदार समीर भुजबळ यांनी २०१३ मध्ये या प्रकल्पासाठी सातत्याने पाठपुरावा केला, ज्यामुळे प्रकल्पाला मान्यता मिळाली. तर मंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष पुढाकारातूनच या प्रकल्पासाठी शिलापूर येथे १०० एकर जागा उपलब्ध करून देण्यात आली. हा प्रकल्प उभारणीत मंत्री भुजबळ यांचे ठळक योगदान आहे.
नाशिक होणार आंतरराष्ट्रीय इलेक्ट्रिकल चाचणी हब
ही प्रयोगशाळा केवळ एक सामान्य प्रयोगशाळा नसून विद्युत उपकरणांची आंतरराष्ट्रीय मानकांनुसार तपासणी करणारे अत्याधुनिक केंद्र आहे. ट्रान्सफॉर्मर्स, केबल्स, स्विचगिअर्स यांसारख्या उपकरणांची जागतिक दर्जाची चाचणी आता नाशिकमध्येच होणार आहे. यामुळे नाशिकमधील तसेच पश्चिम भारतातील उद्योगांना मोठा फायदा होणार आहे. आतापर्यंत या उद्योगांना उपकरणांची चाचणी करण्यासाठी भोपाळ किंवा बंगळुरू येथे जावे लागत होते. आता ही सुविधा स्थानिक स्तरावर उपलब्ध झाल्यामुळे काळ आणि अर्थोत्पादन यांची बचत होणार आहे.
नाशिकमध्ये महिंद्रा अँड महिंद्रा, सिमेन्स, किर्लोस्कर, एबीबी, क्रॉम्प्टन, श्नायडर इलेक्ट्रिक यांसारख्या बहुराष्ट्रीय कंपन्या कार्यरत आहेत. शेकडो लघु-मध्यम उद्योगांसोबतच या मोठ्या कंपन्यांनासुद्धा आता चाचणीसाठी दूरच्या शहरांमध्ये प्रवास करावा लागणार नाही. या प्रयोगशाळेमुळे हजारो कोटींची गुंतवणूक आकर्षित होणार असून, यामुळे अनेकांना रोजगाराची संधी निर्माण होणार आहे. ‘मेक इन इंडिया’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ या संकल्पनांनाही यामुळे बळ मिळेल.
नाशिकची ओळख आंतरराष्ट्रीय पातळीवर
धार्मिक आणि सांस्कृतिक ओळखीबरोबरच नाशिक आता एक महत्त्वाचे औद्योगिक आणि शैक्षणिक केंद्र म्हणून उदयास येत आहे. सीपीआरआय सारख्या आंतरराष्ट्रीय पातळीच्या संस्थेची प्रयोगशाळा येथे उभारली जाणे हे या दिशेने एक मोठे पाऊल आहे. आता इलेक्ट्रिकल उपकरणांच्या चाचणीचे हब म्हणून नाशिकची ओळख राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर होणार आहे.
या प्रकल्पामुळे नाशिकच्या औद्योगिक क्षेत्राला नवीन गती मिळेल असे मत मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले . त्यांनी या यशस्वी उपक्रमासाठी सर्वांनी दिलेले योगदानाचे आभार मानले. नाशिकच्या विकासासाठी केलेल्या या प्रयत्नाला सर्वांनीच प्रतिसाद दिला.
या समारंभासाठी खासदार राजाभाऊ वाजे, आमदार राहुल ढिकले, आमदार डॉ. राहुल आहेर, आमदार देवयानी फरांदे, आमदार सरोज आहिरे, सीपीआरआयचे महासंचालक असित सिंग, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी जलज शर्मा, महानगरपालिका आयुक्त मनिषा खत्री यांसाठी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.