उत्तर महाराष्ट्राच्या युवकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केली सरकारकडे मागणी…

‘औद्योगिकीकरण’ हा शब्द ऐकल्यावर डोळ्यासमोर महाराष्ट्रातील बोटावर मोजण्याइतकीच शहरं आपल्या डोळ्यासमोर येतात. मुंबई, पुणे या दोन शहरांनंतर आपल्याला इतर शहरं माहित नाहीत आणि यामागे कारणही तसेच आहे. महाराष्ट्रातील ही शहरं सोडली तर इतर कोणत्याही जिल्ह्यांत उद्योगधंदे अल्पशा प्रमाणात आहे. परंतु महाराष्ट्राच्या औद्योगिकरणाच्या प्रगतीसाठी हे चित्र बदलणे अत्यावश्यक आहे.

सरकारने औद्योगिकरणाच्या प्रगतीसाठी राज्यातील इतर जिल्ह्यांनादेखील प्राधान्य दिले पाहिजे. आता प्रश्न येतो की हे पर्यायी जिल्हा कोणता? मुंबई, पुणे शहरांना पर्यायी शहर म्हणून उत्तर महाराष्ट्रातील नाशिककडे पाहिले जाते. परंतु इतक्या वर्षांत नाशिकला हव्या तशा रोजगाराच्या संधी उपलब्ध झालेल्या नाही. एकीकडे उद्योगनिर्मितीसाठी नाशिकला पसंती दाखवली जात आहे आणि दुसरीकडे उद्योग उभारणीसाठी जागा मिळत नसल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. शहरात नवीन उद्योगनिर्मिती झालीच नाही तर पोटापाण्यासाठी तरुणांना आपला जिल्हा सोडून राज्यातील इतर ठिकाणी स्थलांतरित व्हावे लागते.

उत्तर महाराष्ट्रातील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध नसल्यामुळे तरुणांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आवाज उठवला आहे. नाशिकच्या औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी सरकारने २००६ साली सिन्नर तालुक्यातील गुळवंच आणि मुसळगाव परिसरात ‘सेझ’ निर्मितीचा निर्णय घेतला होता. या निर्णयाचाच भाग म्हणून सरकारने रोजगार निर्मितीसाठी सिन्नरमधील इंडियाबुल्स कंपनीला २ हजार ६०० एकर जागा दिली होती. त्यातील १५०० एकर जमीन अद्यापही पडून आहे. परंतु १८ वर्ष उलटून गेली तरी सेझमध्ये एकही प्रकल्प येऊ शकला नाही. त्यामुळे इंडियाबुल्सच्या ताब्यातील ही जमीन सरकारने मागे घ्यावी जेणेकरून उत्तर महाराष्ट्रात नवीन उद्योग निर्मितीसाठी जमीन उपलब्ध होईल आणि तरुणांना रोजगाराच्या संधी निर्माण होतील. इंडियाबुल्सच्या ताब्यातील ही पडीक जमीन परत घेण्याच्या मागणीसाठी युवक सोशल मीडियावर चांगलेच आक्रमक झाले आहे. राज्यात होणाऱ्या टेस्ला (Tesla) कंपनीला ही जागा उपलब्ध करून द्यावी, असाही पर्याय युवकांनी सुचवला आहे.

इंडियाबुल्सच्या ताब्यातील ही पडीक जमीन सरकार मागे घेऊन उत्तर महाराष्ट्राच्या विकासाला गती मिळेल का ? याकडे सर्वांचे लक्ष आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.