अण्णा बनसोडे विधानसभेचे नवे उपाध्यक्ष – बिनविरोध निवड, उद्या अधिकृत घोषणा!
मुंबई, २५ मार्च : महाराष्ट्र विधानसभेच्या उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे आमदार अण्णा बनसोडे यांची बिनविरोध निवड झाली आहे. या पदासाठी केवळ महायुतीकडून त्यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता, जो आज (मंगळवार) पडताळणी प्रक्रियेत वैध ठरला. त्यामुळे त्यांची निवड निश्चित झाली आहे. विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर उद्या (26 मार्च) सभागृहात त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा करणार आहेत.
अण्णा बनसोडे – अजित पवारांचे विश्वासू सहकारी
पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार असलेले अण्णा बनसोडे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अत्यंत जवळच्या नेत्यांपैकी एक मानले जातात. 2009 मध्ये पहिल्यांदा आमदारकी मिळवलेल्या बनसोडे यांनी 2014 मध्ये पराभव स्विकारला, मात्र 2019 आणि 2024 मध्ये सलग दोन वेळा विजय मिळवत विधानसभेत पुनरागमन केले.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर त्यांनी अजित पवार गटासोबत राहण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे त्यांना पक्षातील निष्ठावान आणि अनुभवी नेते म्हणून मानले जाते. पिंपरी मतदारसंघ हा अजित पवारांचा बालेकिल्ला मानला जातो आणि अण्णा बनसोडे हे त्यातील एक मजबूत शिलेदार म्हणून ओळखले जातात.
राजकीय कारकीर्द:
– 1997 आणि 2002 – सलग दोन वेळा नगरसेवक
– स्थायी समिती अध्यक्षपद भूषवले
– 2009 – पहिल्यांदा आमदार म्हणून निवड
– 2014 – विधानसभा निवडणुकीत पराभव
– 2019 आणि 2024 – सलग दोन वेळा आमदार म्हणून विजय
– वर्तमानकालीन आमदारकीची तिसरी टर्म
– अजित पवार यांच्या प्रत्येक बंडात ठामपणे पाठिंबा दिला, निष्ठावान नेते म्हणून ओळख
बिनविरोध निवडीमागील राजकीय गणित
अण्णा बनसोडे यांच्या विधानसभेच्या उपाध्यक्षपदाच्या निवडीमुळे पिंपरी-चिंचवड आणि पुणे परिसरात राष्ट्रवादी (अजित पवार गट) अधिक मजबूत होईल, असे राजकीय तज्ज्ञांचे मत आहे. महायुती सरकारमध्ये हा एक मोठा समन्वयाचा निर्णय असल्याचे मानले जात असून, राजकीय समतोल साधत महायुतीने हा पदभार राष्ट्रवादी (अजित पवार गट)च्या वाट्याला दिला आहे.
यामुळे आगामी महापालिका निवडणुकांसाठीही राष्ट्रवादी (अजित पवार गट) अधिक बळकट होईल आणि त्यांच्या प्रभावाखालील भागांमध्ये पक्ष संघटन अधिक मजबूत होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.